जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेव्याचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल. फुले मानायचे म्हणजे पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत हे दरिद्री जनतेने दारिद्रया विरुध्द बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे या श्रद्धेने सारे काही आपोआप होईल ही भावना टाकून द्यावी लागेल. जन्माने ब्राम्हण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ असले माणसामाणसात भेद करणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथांचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथ काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत.
शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री-पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल. स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये.
अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे. कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे. एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधींची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचाही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हाऱ्यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू. एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मूळ विचार दूर टाकता येतात. जसे स्वच्छता हा मूळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे. देव केला कि देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.
विचार- पु. ल. देशपांडे (सामना, २५ नोव्हेंबर १९९०)
Blogger Comment
Facebook Comment